Web    lonari.com



New मा. ना. अजितदादा पवारसाहेब (उपमुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य) यांनी दिनांक ९ जानेवारी २०११ ला बारामती येथील वधू - वर व समाज प्रबोधन मेळाव्यात समाजाला संबोधून केलेले भाषण
मा. ना. अजितदादा पवारसाहेब,
उपमुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य

आहारामध्ये जेवण चवदार बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मिठाची निर्मिती बहुजन समाज्यातील ज्या घटकाकडे सोपविली गेली त्यालाच पुढे लोणारी म्हणून ओळखले जाऊ लागले. मीठ बनविणारा लोणारी समाज नंतर चुनखडी भाजून चुना व लाकडाला भट्टीमध्ये घालून कोळसा बनवू लागला. काळ बदलत गेला उंच उंच इमारती बांधण्यासाठी वापरल्या जाणार्‍या चुन्याची जागा सिमेंटने घेतली. इंधनासाठी म्हणून वापरल्या जाणार्‍या कोळशाची जागा इतर इंधन घटकांनी घेतली. भट्टी चालविणार्‍या लोणारी समाजाने आपल्या व्यवसायाची भट्टी जमविता आली नाही आणि कालांतराने मागास वर्गामध्ये हा समाज गणला जाऊ लागला. परंपरागत व्यवसाय कालबाह्य झाल्यामुळे समाज्यातील बहुतांशी लोकांच्या वाट्याला भटकंती आली. काही लोक शेतीकडे वळले आणि शेती व्यवसायामध्ये स्थिरावले. इंग्रज्यांच्या राजवटीमध्ये 'Tribes and Castes of Bombay' या संशोधन ग्रंथातील दुसर्‍या खंडामध्ये ३९२ ते ३९७ हि ५ पाने लोणारी समाजायाबद्दल माहितीसाठी खर्च झालेली आढळतात. लोणारी समाजाचा १४०० वर्षाचा लिखित इतिहास वळई जी. सातारा, कोळे जि. सांगली येथे उपलब्ध असल्याचे ऐकण्यात येते. १९०१ साली महाराष्ट्रामध्ये लोणारी समाजाची संख्या १९२२२ इतकी नोंदली गेलेली आढळते. या समाजाला महाराष्ट्रात लोणारी, चुनरी, कर्नाटकात उप्पार, उत्तर भारतात लुनिया व मध्य प्रदेश्यात लोणारी देशमुख या नावाने संबोधतात. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास २८ लाख इतकी लोणारी समाजाची संख्या आहे. हा समाज प्रामुख्याने पुणे, नाशिक, सांगली, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने स्थिरावला असून सांगोला - ४५०००, मंगळवेढा - २२०००, माण - ३५०००, कवठेमहांकाळ - ३२०००, जत - ३५०००, आटपाडी - २००००, मालेगाव - २००००, येवला - १२००० या तालुक्यांमध्ये लक्षणीय संखेमध्ये असून समाज व राजकारण यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. बारामती आणि परिसरामध्ये देखील होळ, सोमंथळी, जवळार्जुन, टाकळी, पिंपरी, रावडी या गावांमध्ये प्रमुख समाज म्हणून स्थिरावलेला व कार्यरत दिसतो. मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, अहमदनगर, सातारा या प्रमुख शहरांमध्ये संघटनात्मक पातळीवर समाजातील मंडळी काम करताना दिसतात.

स्वातंत्र्योत्तर काळामध्ये महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांची पुरोगामी विचारसरणी समाजामध्ये रुजल्यामुळे आणि यशवंतराव चव्हाण, शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनामुळे काहीअंशी शिक्षणाकडे आणि उद्योग व्यवसायाकडे वाळू लागला. ७० च्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या समाज आणि राजकारणामध्ये आदरणीय पवारसाहेबांचा उदय झाल्यानंतर आदरणीय साहेबांचे मार्गदर्शन लोणारी समाजाला आणि लोणारी समाजाची साथ साहेबांच्या हिमालायायेवढ्या कर्तुत्वाला मिळत गेली. आदरणीय साहेबांच्या १९६७ च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदार संघातून जे जीवाभावाचे आणि साहेबांवर जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते लाभले त्यामध्ये होळगावचे
कै. बाळासाहेब गिते, कै. नाथसाहेब होळकर, श्री. नथुअण्णा गिते यांची नवे अग्रक्रमाने घ्यावी लागतात. समाजाचा आणि आदरणीय साहेबांचा हा जिव्हाळा आजही कायम आहे व समजाला त्याबद्दल सदैव अभिमान वाटत आला आहे.

होळ येथील दादासाहेब होळकर यांच्या प्रयत्नांनी व साहेबांच्या मार्गदर्शनाने आनंद शिक्षण संस्था, होळ नावा रुपाला आली आणि परिसरातील शेकडो गरिबाघरची मुले शिक्षण घेऊ लागली.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीपासून आणि या कारखान्याच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर कै. बाळासाहेब गिते, कै. नाथासाहेब होळकर आणि त्या नंतर श्री. नथुअण्णा गिते यांचे अनमोल योगदान लाभलेले आहे.

कै. विष्णुपंत दादरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणार्‍या लोणारी समाज सेवा, मुंबई यांच्यामार्फत आटपाडी येथे निवासी गुरुकुल विद्यालय चालविले जात असून या विद्यालयाचा नावलौकिक संपूर्ण परिसरामध्ये असून श्री. किशोर आढाव, श्री. भारत बाड, श्री. महादेव बाड आणि श्री. भोजा काळेल यांच्या प्रयत्नाने हे विद्यालय खडतर परिस्थितीतून आपली मार्गक्रमणा करीत आहे.

करमाळा तालुक्यातील जेऊर या दुष्काळी गावातील शेतमजुराचा मुलगा चंद्रहास निमगिरे महाराष्ट्र केसरी तर बनलाच पण आज करमाळा पंचायत समितीचा उपसभापती म्हणून श्रीमती शामलबाई बागल यांच्या बरोबर सामाजिक जबाबदारी पार पाडताना दिसतो.

महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लोणारी समाजाला सर्वप्रथम काम करण्याची संधी ऍड. विलास लोणारी यांच्या रूपाने नाशिक विधानसभा मतदार संघातील मतदारांनी दिलेली असून सध्या ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई यांच्या नाशिक विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.

बारामती तालुक्यातील संभाजी होळकर हा तरुण कार्यकर्ता आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळे संजय गांधी निराधार योजना या सारख्या योजना तळागाळामध्ये पोहचविण्याचे काम करीत आहे. त्याच्या या कार्याची पावती म्हणूनच आदरणीय अजितदादांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य खात्याच्या सभापती या पदावर नेमणूक करून दिलेली आहे.

पुण्यातील नगरसेवक रवींद्र धंगेकर हे मनसे गटनेते म्हणून संपूर्ण पुणे शहराला परिचित आहेत. या कार्याबरोबरच कसबा विधानसभा मतदार संघात सामाजिक व राजकीय कार्यात सतत अग्रेसर आहेत.

डॉ. रामदास कुटे हे तरुण वैद्यकीय व्यावसायिक वैद्यकीय सांभाळून "इंदुफार्मा" च्या माध्यमातून आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करीत आहेत, त्याचबरोबर युरोपीय देशांमध्ये आयुर्वेदाच्या प्रसारासाठी झटत आहेत. हे सर्व करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून जेजुरी आणि परिसरामध्ये मा. ना. अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत बाके वाटप, मा. ना. अजितदादा पवार वैद्यरत्न पुरस्कार, मा. ना. अजितदादा पवार तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा असे दादांना अपेक्षित असलेले सामाजिक उपक्रम राबवीत आहेत.

होळ येथील प्रशांत विलास होळकर या तरुणाची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आय. पी. एस. अधिकारी म्हणून नुकतीच निवड झाली असून ते प्रशासकीय सेवेमध्ये आपले योगदान देत आहेत.

बारामती येथील श्री. तानाजी कर्चे सर यांनी साई नागरी पतसंस्था स्थापन करून समाजातील उपेक्षित घटकांना अर्थसहाय्य मिळवून देण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पडत आहेत. त्याचबरोबर बारामती तालुका ओ. बी. सी. सेलच्या अध्यक्ष पदावरून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच नुकताच त्यांना राष्ट्रीय पातळीवरील बिजनेस डेव्हलपमेंटचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

कसलीही पार्श्वभूमी नसताना पितांबर काळे हा धडपड्या युवक मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये दिग्दर्शक म्हणून आपले बस्तान बसवितो. जवळपास १४ वेगवेगळ्या आशयाच्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन यांनी केले असून बिनकामाचा नवरा, बापू विरू वाटेगावकर हि यातली काही ठळक नावे आहेत.

नितीन काळेल, नितीन डांगळ व त्यांची टीम या आई. टी. क्षेत्रात काम करणार्‍या युवकांच्या माध्यमातून समाजाला एकत्रित करण्यासाठी www.lonari.com या वेबसाईटचा उपयोग करीत आहेत. त्याचबरोबर खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून समाजाला जोडण्याचे व युवकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करीत आहेत.

पुणे, जेजुरी, पंढरपूर, अहमदनगर या ठिकाणी समाजातील दृष्ट्या मंडळींनी समाजबांधव एकत्र येण्यासाठी अनेक आश्रमशाळांची, मठांची, बांधणी करून ठेवलेली आहे. कालांतराने त्यामध्ये जी सुधारणा होणे अपेक्षित आहे ती न झाल्यामुळे या शहरातील अत्यंत मोक्याच्या जागा वापराविना पडून आहेत. समाजातील कर्ती मंडळी एकत्र येऊन शासनाच्या माध्यमातून या जागांचा विनियोग समाजाच्या उत्कर्षासाठी अधिक चांगल्याप्रकारे करू शकतात. त्यासाठी शासनाचे सहकार्य अपेक्षित आहे.